गौताळा अभयारण्य परिसरात वनविभागाची कारवाई

मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी घरामध्ये एक काळवीट बांधून ठेवल्याचे पथकाला आढळून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी काळविटाची सुरक्षित सुटका करून त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी सुभाष शिवाजी कुऱ्हाडे (रा. शिवापूर), वनमजूर याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कलम ९, ३९(अ), ३९(ब), ४०(२) आणि ५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
काळवीट हा संरक्षित वन्यप्राणी असल्याने त्याचा बेकायदेशीर ताबा ठेवणे किंवा त्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. हे काळवीट नेमके कुठून आणण्यात आले, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे तसेच त्याची विक्री करण्याचा प्रयत्न होता का, याचा तपास वनविभागाकडून सुरू आहे.
दरम्यान, संबंधित वनमजुराच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याचीही या प्रकरणात भूमिका असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हा केवळ संशय असून संबंधित भूमिकेबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता होणार आहे.








