धक्का मारून हातातील रोकड हिसकावली; ५५ ते ६० वयोगटातील अनोळखी व्यक्तीविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील नवीन बसस्थानक परिसरात एका ज्येष्ठ मजुराच्या हातातील २१ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद बाबू खाटीक (वय ६८, रा. आसोदा, ता. जि. जळगाव) हे मजुरीचे काम करतात. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते जळगाव येथील नवीन बसस्थानक परिसरातील सार्वजनिक ठिकाणी होते.
यावेळी त्यांच्या ताब्यात २० हजार रुपयांची रोकड, त्यामध्ये ५०० रुपयांच्या ४० नोटा आणि १ हजार रुपयांची रोकड, त्यामध्ये २०० रुपयांच्या पाच नोटा, अशी एकूण २१ हजार रुपये रोख रक्कम होती.
दरम्यान, अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयोगटातील एका अनोळखी इसमाने फिर्यादीच्या हाताला धक्का मारून त्यांच्या ताब्यातील रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि तेथून पळून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या वर्णनानुसार संशयित व्यक्ती सावळ्या रंगाचा, शर्ट-पँट घातलेला, अर्धवट टक्कल असलेला आणि अंदाजे साडेपाच फूट उंचीचा असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.
घटनेनंतर फिर्यादीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे करीत असून, संशयिताचा शोध सुरू आहे.









