बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त ३०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
शिरसोली (प्रतिनिधी) :- गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा संदेश देत बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळू मातीपासून गणपती तयार करण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यालयातील तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांना वाव दिला.


या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शाळू मातीचा वापर करून आकर्षक व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी तसेच पारंपरिक सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याची भावना रुजावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे अध्यक्ष माननीय श्री. निलेशभाऊ खलसे तसेच उपाध्यक्ष माननीय श्री. पंडितभाऊ जाधव यांनी उपक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या सुंदर गणेशमूर्तींचे त्यांनी कौतुक केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. एस. आंबटकर सर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. सदर उपक्रमाचे नियोजन व आयोजन विद्यालयाच्या कला विभागामार्फत करण्यात आले. कलाशिक्षक श्री. ए. टी. बावस्कर व श्री. एस. एन. ताडे यांनी उपक्रमाचे कामकाज पाहिले.









