जुने जळगाव, सदोबा नगर परिसरात घटना ; कुटुंबांवर ओढावला शोककाळ


जुने जळगाव येथील खळवाडी परिसरात राहणारा राज सुकलाल बारी (वय २३) या तरुणाने गुरुवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. राज हा आपल्या आई-वडिल, पत्नी आणि दोन वर्षांच्या लहान मुलासह राहत होता. वडिलोपार्जित दूध व्यवसाय सांभाळून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गुरुवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
राज याच्या पश्चात दोन वर्षांचा लहान मुलगा व पत्नी असा परिवार असून, त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांनी रुग्णालयात केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी दुर्दैवी घटना सदोबा नगर परिसरात घडली. येथे राहणारा निखिल सुनील पाटील (वय ३४) हा तरुण परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करून आई, वडिल, पत्नी आणि एका मुलीचा सांभाळ करत होता. गुरुवारी संध्याकाळी कामावर असताना निखिल दुकानाच्या गोडाऊनमध्ये गेला होता. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने आणि भ्रमणध्वनी (फोन) उचलत नसल्याने दुकानातील एका कर्मचाऱ्याने गोडाऊनमध्ये जाऊन पाहिले असता, निखिल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
स्थानिक नागरिकांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ऐन सणाच्या दिवशीच कमावता मुलगा गमावल्यामुळे पाटील कुटुंबावर मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली व रुग्णालयात नातेवाईकांकडून माहिती घेतली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच शहरातील दोन वेगवेगळ्या भागांतील दोन तरुण मुलांनी टोकाचे पाऊल उचलल्याने जळगाव शहरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही घटनांमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.








