अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
फैजपूर | प्रतिनिधी


फैजपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीकाठी असलेल्या दुमजली घरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून चार महिलांची सुटका केली. ही कारवाई गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजता करण्यात आली.
उपविभागीय पोलिस अधिकारी फैजपूर अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर उपविभागीय पोलिस कार्यालय, यावल पोलिस ठाणे आणि निंभोरा पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकलूद येथील मनीषा प्रकाश झोपे (वय ४५) ही महिला सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत आधी पंटर पाठविला. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिस पथकाने घरावर छापा टाकला.
घरात अनेक खोल्यांची रचना
छाप्यादरम्यान दुमजली घरामध्ये वेश्याव्यवसायासाठी अनेक खोल्या तयार करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांची पोलिसांनी सुटका केली.
यातील तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील असून सध्या भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. तर एक महिला भुसावळ येथीलच असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी कुंटणखाना चालविणाऱ्या मनीषा झोपे हिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.








