राजणगाव शिवारात पत्राचे शेड फोडून ७५ हजार रुपयांचे १० बोकड व ५ शेळ्या लांबवल्या; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल


चाळीसगाव: चाळीसगाव तालुक्यातील राजणगाव शिवारातील एका शेतातील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रुपये किमतीचे १० बोकड, ५ शेळ्या आणि २ लहान पिल्ले चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वाघडू (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी रावण तोताराम पाटील (वय ५३, व्यवसाय- शेती) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.०० ते १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान राजणगाव शिवारातील शेत गट क्रमांक १११/ब मधील पत्र्याच्या शेडमध्ये ही चोरीची घटना घडली.
अज्ञात चोरट्याने शेडच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि फिर्यादी यांच्या मालकीचे १० बोकड, ५ शेळ्या व २ लहान पिल्ले असा एकूण ७५ हजार रुपये किमतीचा पशुधन ऐवज चोरून नेला. या प्रकरणी १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४.०२ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २४६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(a) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय श्रीकृष्ण माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार संदीप माने करत असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.









