मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला


पाच जणांच्या टोळक्याची कोल्हे हिल्स परिसरात दहशत; चॉपरच्या वारांसह लाकडी दांडक्याने मारहाण
जळगाव : कुरकुरे घेण्यासाठी गेलेल्या मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांवर चॉपरने वार करून तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना १० ऑगस्ट रोजी रात्री कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धीविनायक चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाने फोन करून सांगितली मारहाणीची घटना
प्रशांत रमेश सूर्यवंशी (वय ४५, रा. कोल्हे हिल्स) यांचा मुलगा १० ऑगस्ट रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास सिद्धीविनायक चौकातील एका दुकानावर कुरकुरे घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला मारहाण झाल्याचे त्याने फोन करून वडिलांना सांगितले.
मुलाच्या फोननंतर प्रशांत सूर्यवंशी हे त्याला सोबत घेऊन संबंधित दुकानाजवळ गेले. त्याठिकाणी अमर सोनवणे, मुकेश जाधव, सागर दोहरे आणि गौतम सोनवणे हे उभे होते. प्रशांत सूर्यवंशी यांनी अमर सोनवणे याला मुलाला मारहाण करण्याबाबत विचारणा केली असता, त्याच्यासह गौतम सोनवणे यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
भांडण सोडविण्यास गेलेल्या भावावरही हल्ला
वाद वाढल्यानंतर संशयितांनी हातातील चॉपरने प्रशांत सूर्यवंशी यांच्यावर वार केले. यावेळी त्यांचा भाऊ राजू रमेश सूर्यवंशी तसेच पुतणे भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण केली. राजू सूर्यवंशी यांच्यावरही चॉपरने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले.
उपचारानंतर गुन्हा दाखल
चॉपरच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना या प्रकरणी अमर विलास सोनवणे, मुकेश प्रकाश जाधव, सागर विमले दोहरे, गौतम सोनवणे आणि शुभम सोनवणे (सर्व रा. सिद्धीविनायक चौक, कोल्हे हिल्स) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक विजय निकम करीत आहेत








