वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
६५ वर्षांच्या वृद्धांसह ५ जणांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
वरणगाव (विशेष प्रतिनिधी): खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका अल्पवयीन मुलासह चार संशयित आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.


वर्षभराच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रसंगी अत्याचार
वरणगाव शहरातील एका भागात वास्तव्यास असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला खाऊच्या पैशांचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात येत होते. सुमारे वर्षभराच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रसंगी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोहर रामा पाटील (वय ६५), मधुकर विश्वनाथ भारंबे (वय ६४), नारायण सोमा चौधरी (वय ५०), विनायक वसंत पाटील (वय ५२) आणि एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत यातील चारही प्रौढ आरोपींसह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
वेगवेगळ्या प्रसंगी स्वतंत्रपणे घडल्या घटना
पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना एकाच वेळी किंवा एकाच ठिकाणी घडलेली नाही. तसेच सर्व आरोपींनी एकत्र येऊन केलेला सामूहिक अत्याचाराचा हा प्रकार नसून, वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या प्रसंगी स्वतंत्र आरोपींकडून हे कृत्य घडल्याचा आरोप आहे. पीडितेला कोणत्या परिस्थितीत विविध ठिकाणी नेण्यात आले, यामध्ये नेमका कोणाचा सहभाग होता आणि इतर काही बाबी आहेत का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला तपासाचा आढावा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस उपअधीक्षक संदीप गावित तसेच मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांनी वरणगाव पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेतली व आवश्यक सूचना दिल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी अत्यंत संवेदनशीलतेने चर्चा करून प्रकरणाची माहिती घेतली आहे.
वैद्यकीय अहवाल व पुरावे ठरणार महत्त्वाचे
या गंभीर प्रकरणात पीडितेचा जबाब, वैद्यकीय तपासणी अहवाल आणि घटनास्थळांची पडताळणी हे कायदेशीर दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरणार आहेत. पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक ते पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. तपासादरम्यान समोर येणाऱ्या प्रत्येक बाबीची स्वतंत्रपणे पडताळणी करूनच पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









