जळगाव शहरातील द्रौपदी नगरातून अडीच लाखांची स्विफ्ट डिझायर कार लांबवली


जिल्हापेठ पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (विशेष प्रतिनिधी): जळगाव शहरातील द्रौपदी नगर परिसरातून सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार एका अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास ही चोरी झाली असून, या प्रकरणी १० ऑगस्ट रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्लॉट नंबर ६४, गट नंबर ४०, द्रौपदी नगर येथील रहिवासी व सेवानिवृत्त नागरिक संजय दिनकर पाटील (वय ६१) यांनी आपली मारुती स्विफ्ट डिझायर व्हीडीआय (Maruti Swift Dzire VDI) मॉडेलची पांढऱ्या रंगाची कार (क्र. MH-19 BU-1586) ही राहत्या घराच्या कंपाऊंडला लागून असलेल्या रस्त्याच्या कडेला पार्क केली होती.
९ ऑगस्ट रोजी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने मालकाची कोणतीही संमती न घेता लबाडीच्या इराद्याने ही कार चोरून नेली. सर्वत्र शोध घेऊनही कारचा काहीही सुगावा न लागल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.या प्रकरणी संजय दिनकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









