अमळनेरात पिकअपमधून ३ बैलांची निर्दयतेने अवैध वाहतूक


२ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा
अमळनेर (विशेष प्रतिनिधी): पिकअप वाहनामध्ये ३ बैलांना अतिशय दाटीवाटीने बांधून त्यांची निर्दयतेने व बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या एका पिकअप चालकासह क्लिनरवर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. अमळनेर शहरातील गळवाडे रोडवरील ढगुबाई मंगल कार्यालयासमोर ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गळवाडे रोडवरून एक बोलेरो पिकअप गाडी (क्रमांक MH-20-EG-0965) संशयास्पदरीत्या जात असताना पोलिसांनी तिला थांबवले. गाडीची पाहणी केली असता, त्यात कोणतीही परवानगी नसताना ३ बैल अत्यंत दाटीवाटीने, असह्य वेदना होतील अशा क्रूर स्थितीत बांधलेले आढळून आले.
पोलिसांनी ४५ हजार रुपये किमतीचे ३ बैल आणि वाहतुकीसाठी वापरलेली २ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सुनील भबुता पाटील यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:५६ वाजेच्या सुमारास वाहनचालक किशोर भिका धनगर (वय २८, रा. धनगर गल्ली, धरणगाव) आणि क्लिनर रोहित बना खैरनार (वय २१, रा. टोळी, ता. धरणगाव) या दोघांविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यासह गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









