तांबोळे येथे पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने ७३ वर्षीय वृद्धाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
चाळीसगाव (विशेष प्रतिनिधी): आपल्या पत्नीला विनाकारण शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या ७३ वर्षीय वृद्धाला चापटबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील संतोष कुमावत यांच्या किराणा दुकानासमोर ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तांबोळे बुद्रुक येथील रहिवासी सैय्यद नवाज सैय्यद सुपडू (वय ७३, व्यवसाय- टेलरिंग) यांच्या पत्नी समशतबिस यांना संशयित नंदू रामेश्वर कुमावत याने विनाकारण शिवीगाळ केली. सैय्यद नवाज हे विचारणा करण्यासाठी गेले असता, आरोपीने त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “माझ्याकडे पैसे आहेत, तुमचे कांड करून टाकीन” अशी धमकी देऊन दमदाटी केली.
या प्रकरणी सैय्यद नवाज यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:१२ वाजेच्या सुमारास आरोपी नंदू रामेश्वर कुमावत (रा. तांबोळे बु., ता. चाळीसगाव) याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ३५१(३), ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे











