जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल


जळगाव (विशेष प्रतिनिधी): शहरात एम. जे. कॉलेजच्या बाजूला असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमसमोर भरधाव आणि बेपरवा चाललेल्या रिक्षाने धडक दिल्याने १७ वर्षीय मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे. ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, अपघात घडवल्यानंतर रिक्षाचालक वाहनासह पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दीक्षा दीपक मगरे (वय १७, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) ही एम. जे. कॉलेजजवळून जात असताना, एका अज्ञात तीनचाकी रिक्षाचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपले वाहन भरधाव वेगाने, बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे चालवले. त्याने दीक्षा हिला जोरदार धडक (ठोक) देऊन अपघातात दुखापत केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी मुलीचे वडील दीपक नाना मगरे (वय ३८, व्यवसाय- मजुरी, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:५२ वाजेच्या सुमारास अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५(ब), १२५(अ) सह मोटर वाहन कायदा (MV Act) कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गुन्हा रजि. नं. २२५/२०२६).
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत कळसकर (पोहेकॉ/१९६१) हे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून, पसार झालेल्या अज्ञात रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे.








