जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार


एम.आय.डी.सी. पोलिसांत गुन्हा दाखल; ५६ वर्षीय व्यवसायिक जखमी
जळगाव:
“रात्री जे झाले ते विसरून जा” असा सल्ला देण्यासाठी गेलेल्या ५६ वर्षीय रद्दी व्यावसायिकावर एका तरुणाने किरकोळ कारणावरून चाकूने सपासप वार करून, दगडाने ठेचून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव शहरातील भुसावळ रोडवरील दूरदर्शन टॉवरजवळ असलेल्या ‘नेपा रद्दी सेंटर’समोर गुरुवारी सकाळी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रोडवरील वैष्णवी माता मंदिराजवळ राहणारे राजेश गंगाराम रेड्डी (वय ५६) हे रद्दीचा व्यवसाय करतात. गुरुवारी (६ ऑगस्ट) सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास ते दूरदर्शन टॉवरजवळील नेपा रद्दी सेंटर येथे गेले होते. तेथे त्यांनी संशयित करण राजेश रेड्डी यास “रात्री जे काही झाले ते विसरून जा,” असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
यावर संशयित करण याने “तू येथे कशाला आला आहेस?” असा जाब विचारला. त्यावर राजेश रेड्डी यांनी “तुझ्या वडिलांना विचार,” असे उत्तर दिले. या क्षुल्लक बोलण्याचा प्रचंड राग आल्याने करण याने बेछूट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने तात्काळ खिशातून चाकू काढून राजेश रेड्डी यांच्या डाव्या खांद्यावर, उजव्या बरगडीवर आणि डाव्या हाताच्या मनगटावर मारून गंभीर दुखापत केली. वार झाल्यानंतर जखमी राजेश रेड्डी बाहेर पळत असताना, आरोपीने खाली पडलेला दगड उचलून त्यांच्या डाव्या पायाच्या पंजावर मारून दुखापत केली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजेश रेड्डी यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१) (धारदार शस्त्राने दुखापत करणे), ११५(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रामदास कुंभार करत आहेत.









