जानवे येथे बंद घराचे कुलूप तोडून ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले


अमळनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल
अमळनेर ;- तालुक्यातील जानवे येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ३६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जानवे येथील रहिवासी व वृद्ध शेतकरी सुरेश गोबा पाटील (वय ७०) हे गुरुवारी (६ ऑगस्ट) रात्री नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाची उचकापाचक करून चोरट्याने १० हजार रुपयांचे सोन्याचे झुमके (५ ग्रॅम), १० हजार रुपयांची सोन्याची अंगठी (५ ग्रॅम), ६ हजार रुपयांची सोन्याची काप (३ ग्रॅम) तसेच १० हजार रुपयांचे चांदीचे पैंजण व कंबरपट्टा असा एकूण ३६ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबवला.
शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घरातील मंडळी उठली असता दरवाजाचे कुलूप तोडलेले आणि सामानाची उचकापाचक झालेली निदर्शनास आली. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरेश पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी सायंकाळी ५:०४ वाजता भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मिलिंद सोनार करत आहेत.









