बोदवड तालुक्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती; पती, सासरच्यांसह आई-वडिलांवर पॉक्सोचा गुन्हा दाखल


धुळे रुग्णालयात बाळ जन्माला आल्यावर उघड झाला बालविवाह; बोदवड पोलिसांत गुन्हा वर्ग
बोदवड (जि. जळगाव):
बालविवाहाची कुप्रथा आणि अल्पवयीन मुलींचे आरोग्य यासंदर्भात एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिल्यानंतर हा बालविवाह उघडकीस आला आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी आणि अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराप्रकरणी पती, सासू, सासरे आणि मुलीच्या आई-वडिलांसह एकूण ५ जणांविरुद्ध पॉक्सो व बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील खोपरपाटा येथील मूळ रहिवासी असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीचा (वय १७, जन्मतारीख १०/०२/२०१०) विवाह दोन वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांनी रोशन तोरे याच्याशी लावून दिला होता.
लग्नानंतर पीडित मुलगी गरोदर राहिली. तिला १ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे येथे दाखल करण्यात आले, तेथे तिने मुलाला जन्म दिला. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीदरम्यान व कागदपत्रांची पडताळणी करताना ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.
धुळ्यातून ‘झिरो FIR’ नोंदवून गुन्हा बोदवडला वर्ग
अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्याचे लक्षात येताच धुळे शहर पोलीस ठाण्याच्या ग्रेड पो.उपनिरीक्षक रेखा सोनवणे यांनी धुळे येथे ‘झिरो एफआयआर’ (क्र. ००/२०२६) नोंदवला. घटनास्थळ व सासर बोदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने गुरुवारी (७ ऑगस्ट) हा गुन्हा बोदवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्यात पती , सासू , सासरे रा. ता. बोदवड) तसेच मुलीची आई वडील (रा. ता. अमळनेर) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२), बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९, १०, ११ आणि पॉक्सो कायदा कलम ६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.








