नशेत तृतीयपंथीयाने ब्लेडने स्वतःचा गळा चिरला


शिव कॉलनीतील घटनेने खळबळ; गंभीर जखमीवर जीएमसीत उपचार, गळ्याला ३० टाके
प्रतिनिधी | जळगाव : दारूच्या नशेत दाढी करण्याच्या ब्लेडने ३० वर्षीय तृतीयपंथीय व्यक्तीने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतल्याची घटना शुक्रवारी (७ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिव कॉलनी परिसरातील शंभर फुटी रस्त्यालगत घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचार सुरू असून, त्याच्या गळ्याला तब्बल ३० टाके घालण्यात आले आहेत.
रक्ताच्या थारोळ्यात आढळला
खंडेराव नगरातील इम्रान युसूफ पठाण (वय ३०) हे शुक्रवारी दुपारी शिव कॉलनी परिसरातील शंभर फुटी रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या भूखंडात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांच्या तृतीयपंथीय सहकाऱ्यांना दिसले. त्यांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी जीएमसी रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांकडून चौकशी
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी जीएमसी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. जखमी व्यक्ती शुद्धीत नसल्याने त्याने नेमक्या कोणत्या कारणातून स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार केले, याचा खुलासा होऊ शकलेला नाही.
गुन्ह्याची अद्याप नोंद नाही
घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसल्याने पोलिसांनी अद्याप गुन्ह्याची नोंद केलेली नाही. जखमीची प्रकृती आणि शुद्धीवर आल्यानंतर मिळणारी माहिती यानंतर घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली.








