शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा
गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि रथोत्सवाचेही आश्वासन
शिरसोली | प्रतिनिधी


माध्यमिक शिक्षण विद्या मंडळ संचलित बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरसोली येथे शुक्रवार (दि. ७) रोजी शिवसेना जळगाव ग्रामीण, ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान आणि भवरलालजी अँड कांताबाई जैन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्यामभाऊ कोगटा, सामाजिक कार्यकर्ते रविंद्रभाऊ नवाल, संस्थेचे अध्यक्ष ॲड. निलेश खलसे, सचिव सुरेश अस्वार, शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप बारी, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बारी, खजिनदार कमलाकर तांदळे, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर तसेच संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
शिरसोलीत रथोत्सव आणि शिवरायांचा पुतळा उभारण्याची घोषणा
सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात श्यामभाऊ कोगटा यांनी सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिरसोली येथे रथोत्सव सुरू करण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा केली.
शाळेला सौरऊर्जा प्रकल्पाची भेट
शाळेचा विजेचा खर्च कमी होऊन तो निधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी वापरता यावा, यासाठी विद्यालयात सौरऊर्जा (सोलर) प्रकल्प उभारून देण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संस्कारही जपावेत, असे सांगत “आईबाबा आधी की साईबाबा?” या प्रश्नातून आई-वडिलांचा सन्मान करण्याचा आणि दररोज त्यांना नमस्कार करण्याचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता, ‘दामिनी पथका’ची मागणी
पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या मदतीबद्दल काही विद्यार्थ्यांनी ‘आमचे प्रिय मामाश्री’ या शीर्षकाखाली आभारपत्रे सादर केली. तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी पायल बारी हिने मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळेत दामिनी पथक उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
मोफत लेखन साहित्याचे वाटप
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन पर्यवेक्षक सुनील भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन दिपाली पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन नंदा अकोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक प्रमुख घनश्याम काळे, कांचन धांडे, ललित पाटील, क्रीडा शिक्षक संजय काटोले तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.









