नशिराबाद येथील भवानी नगरवर शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यात पुन्हा एकदा बेफाम धावणाऱ्या अवजड वाहनाने एका निष्पाप तरुणाचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. साकेगाव येथून मजुरीचे काम करून घरी परतणाऱ्या सोनू रामा बागले (वय २९, रा. भवानी नगर, नशिराबाद) या तरुणाचा अपघातात जागीच चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे नशिराबाद व भवानी नगर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोनू बागले हे दिवसभर साकेगाव येथे मजुरीचे काम आटोपून पिकअप वाहनाने घरी परतत होते. टोलनाका परिसरात आले असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका टँकरने पिकअपला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, पिकअपमध्ये बसलेले सोनू बागले थेट रस्त्यावर फेकले गेले. त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रालाचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
मृत सोनू बागले हे हातमजुरी आणि बांधकामावर बिगारी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा मुख्य आधारवडच हिरावला गेला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
घटनेचे वृत्त कळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या परिसरातून जाणाऱ्या अवजड वाहनांच्या बेफाम वेगावर तात्काळ नियंत्रण आणावे, अशी तीव्र मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.








