मुलांना ओरडल्याचा राग; फैजपूरात लोखंडी कड्याने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा

फैजपूर (प्रतिनिधी) : घरासमोर खेळणाऱ्या मुलांना ओरडल्याच्या कारणावरून एका व्यक्तीवर लोखंडी कड्याने हल्ला करून मारहाण केल्याची घटना फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाडळसा येथे घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी जीवन दिलीप पाटील (वय ३६, रा. हाऊसिंग सोसायटी, मारोती मंदिराजवळ, पाडळसा, ता. यावल) यांनी घरासमोर मोठ्याने आरडाओरडा करणाऱ्या काही मुलांना शांत राहण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपी भावेश सतीश चौधरी व भूषण योगेश चौधरी (दोघे रा. हाऊसिंग सोसायटी, पाडळसा) यांनी फिर्यादीशी वाद घालत मारहाण केली.
यामध्ये आरोपी भावेश चौधरी याने हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून दुखापत केली, तर भूषण चौधरी याने चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक १६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी मोती पराग पवार करीत आहेत.









