जळगाव जिल्ह्यात ६ ऐवजी तब्बल ५४ ‘ब्लॅक स्पॉट्स’; पोलिसांचा अपघातप्रवण ठिकाणांचा नव्याने सखोल अभ्यास

MoRTH च्या निकषांनुसार ओळख; प्रत्येक ठिकाणाचे अक्षांश-रेखांश निश्चित, अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांना वेग
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी मोठा पुढाकार घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांच्या निकषांनुसार जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा नव्याने सखोल अभ्यास करण्यात आला असून, पूर्वी अस्तित्वात असलेल्या केवळ ६ ब्लॅक स्पॉट्स ऐवजी आता ५४ ब्लॅक स्पॉट्स निश्चित करण्यात आले आहेत.
पोलिसांनी तीन वर्षांतील अपघातांचा अभ्यास करून ज्या ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर अथवा प्राणांतिक अपघात झाले आहेत, अशा ठिकाणांची ब्लॅक स्पॉट म्हणून नोंद केली आहे. प्रत्येक ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करण्यासाठी त्यांचे अक्षांश (Latitude) आणि रेखांश (Longitude) देखील नोंदविण्यात आले आहेत.
अनेक प्रमुख महामार्गांचा समावेश
नव्या यादीत राष्ट्रीय महामार्ग ५२, राष्ट्रीय महामार्ग ५३, राष्ट्रीय महामार्ग १५६, राष्ट्रीय महामार्ग ७५३एफ, ७५३जे, ७५३एल तसेच राज्य महामार्गांवरील विविध अपघातप्रवण ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील जळगाव शहर, एमआयडीसी, जळगाव तालुका, भुसावळ, मुक्ताईनगर, वरणगाव, चाळीसगाव, मेहुणबारे, पाचोरा, जामनेर, अमळनेर, पारोळा, एरंडोल, चोपडा, धारणगाव, नशिराबाद, फैजपूर आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रस्ते या अभ्यासात समाविष्ट करण्यात आले आहेत.
अपघात प्रतिबंधासाठी ठरणार महत्त्वाचे
या ब्लॅक स्पॉट्सची अचूक माहिती उपलब्ध झाल्याने संबंधित विभागांना वेगमर्यादा नियंत्रण, इशारा फलक, रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाशयोजना, रस्ता रुंदीकरण, स्पीड कॅमेरे, रंबल स्ट्रिप्स आदी उपाययोजना राबविणे अधिक सुलभ होणार आहे. यामुळे भविष्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाच्या समन्वयातून पुढील कार्यवाही
जळगाव पोलिसांनी तयार केलेली ही यादी संबंधित प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इतर यंत्रणांना पाठविण्यात येणार असून, प्रत्येक ब्लॅक स्पॉटवर आवश्यक सुधारणा करण्यासाठी समन्वयाने कार्यवाही करण्यात येणार आहे. रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने जळगाव पोलिसांचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.









