जळगाव शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचार; पतीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

जळगाव: शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे २१ डिसेंबर २०२५ रोजी तिच्या पालकांच्या संमतीने जळगाव येथील एकाशी तिचा बालविवाह झाला होता. त्यानंतर ७ जून २०२६ पासून ती पती याच्यासोबत त्याच्या घरी राहू लागली.
दरम्यान, २७ जुलै २०२६ रोजी फिर्यादीस उलट्या आणि मळमळीचा त्रास होऊ लागल्याने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले. पीडित मुलगी कायदेशीरदृष्ट्या अल्पवयीन असल्याने वैद्यकीय तपासणीनंतर ३० जुलै २०२६ रोजी रात्री या प्रकरणी , जळगाव शहर पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा रजिस्टर क्रमांक २२६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(m) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावित्री ढगे करत आहेत.









