शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथील घटना
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथे शेताच्या वादातून २८ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता फिर्यादी जगदीश प्रल्हाद पाटील (वय २८, रा. आसनखेडा खुर्द, ता. पाचोरा) हे आपल्या शेतात काम करत असताना ही घटना घडली.
शेताच्या सीमावादावरून आरोपी सुरेश लक्ष्मण पाटील व नामदेव सुरेश पाटील (दोघेही रा. आसनखेडा, ता. पाचोरा) यांनी फिर्यादीशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपी नामदेव पाटील याने हातातील काठीने फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.









