काकडी तोडण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी; १३ जणांसह इतरांविरुद्ध भडगाव पोलिसांत गुन्हा

भडगाव | प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील भातखंडे (बु.) येथे शेतातील काकडी तोडण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी १३ नामनिर्देशित आरोपींसह अन्य ५ ते ६ जणांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास भातखंडे (बु.) गावातील पीक संरक्षण संस्थेसमोरील रस्त्यावर ही घटना घडली. फिर्यादीचे भाऊ नितीन दयाराम पाटील व पुतणे दीपक नितीन पाटील यांच्या शेतातील काकडी काही जण तोडत असल्याचा विरोध केल्याचा राग मनात धरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवत दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी अनिल दयाराम पाटील (वय ५६, व्यवसाय–शेती, रा. भातखंडे (बु.), ता. भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यात रमेश सोमा नाईक, सुपडू तिरसिंग भिल, अरुण सुपडू भिल, संजय शिवा भिल, अनिल विक्रम मोरे, विकास रमेश सोनवणे, शाम आप्पा सोनवणे, नवल पोपट सोनवणे, आकाश बाळू मोरे, दिनकर प्रकाश भिल, दीपक प्रकाश भिल, नामदेव सुपडू भिल यांच्यासह अन्य ५ ते ६ जणांचा समावेश आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १९१(१), १९१(२), १९१(३), ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









