१७ वर्षांखालील मुलांचे सुवर्णपदक; १५ वर्षांखालील मुलांना रौप्य, तर मुलींना कांस्यपदक
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव तसेच जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा २०२६ मध्ये गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले. विविध गटांमध्ये पदके पटकावत शाळेच्या क्रीडा परंपरेला नवे वैभव प्राप्त करून दिले. दि. ९ ते ११ जुलै २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुले, १७ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुली अशा तीन गटांमध्ये सामने खेळविण्यात आले. प्रत्येक सामन्यात गोदावरीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली.१५ वर्षांखालील मुलांच्या गटात गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदक मिळविले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात संघाने शानदार खेळ करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटात संघाने तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळविले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या सौ. नीलिमा चौधरी यांनी सर्व खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि संघभावनेमुळे विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, संस्थेच्या पदाधिकार्यांनी, शिक्षकवृंद आणि क्रीडा प्रशिक्षकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट परंपरेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.










