एरंडोल तालुक्यातील रावंजे बुद्रुक नदीपात्रातील कारवाई; चालक व मालकाविरुद्ध गुन्हा
एरंडोल (प्रतिनिधी): तालुक्यातील रावंजे बुद्रुक येथील नदीपात्रात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करत असलेल्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक व ट्रॅक्टर मालकाविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी सायली विश्वास बरगे (वय २४) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रावंजे बुद्रुक येथील नदीपात्रात परवानगीशिवाय गौण खनिज असलेल्या वाळूचे उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली.
कारवाईदरम्यान एमएच-१९-सीयू-४५१३ क्रमांकाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर अंदाजे एक ब्रास वाळूसह आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरची किंमत सुमारे २ लाख रुपये, तर वाळूची किंमत ६ हजार रुपये असून एकूण २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी ट्रॅक्टर चालक मनोज ज्ञानदेव मराठे (रा. खची बु., ता. एरंडोल) तसेच ट्रॅक्टर मालक राजेंद्र दगडू पाटील (रा. कल्याणे खुर्द, ता. धरणगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि खनिज विकासाशी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस करीत असून, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.









