जळगाव रामानंद नगर पोलिसांत गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) :- राज्य उत्पादन शुल्क विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश सुनील सुरडकर (वय २७, रा. तंत्रनगर, खामगाव, जि. बुलढाणा) यांना आरोपी शंकर विश्वनाथ नाईक (रा. विशाल नगर, जागृत गणपती मंदिरासमोर, मोर चौक, नांदेड) याने राज्य उत्पादन शुल्क विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.
ऑक्टोबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आरोपीने फिर्यादीकडून विविध टप्प्यांत १४ लाख रुपये घेतले. मात्र, नोकरी न लावता तसेच घेतलेली रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक २१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(२) व ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय तडवी करीत असून, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.









