जळगाव जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई: ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी): – नशिराबाद येथून सुनसगावडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतात चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा (कुंटणखाना) नशिराबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहात अटक केली असून, दोन पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली आहे. तसेच घटनास्थळावरून ९१ हजार ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) योगिता नारखेडे यांना नशिराबाद ते सुनसगाव रोडवरील एका शेतात अनैतिक वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ खाजगी पंटरच्या माध्यमातून बातमीची खात्री केली. माहितीमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट होताच, पोलीस पथकाने दुपारी १४:२० वाजताच्या सुमारास सदर ठिकाणी अचानक छापा टाकला.
या छाप्यात प्रदीप जनार्दन रोटे (वय ५७) आणि कैलास संजय भोई (दोन्ही राहणार नशिराबाद) या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या सांगण्यावरून व संगनमताने हा कुंटणखाना चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना गुन्ह्यात रीतसर अटक केली आहे. या कारवाईदरम्यान नरकयातना भोगत असलेल्या दोन पीडित महिलांची पोलिसांनी यशस्वीरी्या सुटका केली आहे.
या कारवाईत गुन्ह्याशी संबंधित रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण ९१,०६० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध अधिनियम (PITA) कलम ३, ४, ५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि योगिता नारखेडे करीत आहेत.
सदर धडक कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदिप गावित, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग श्री. केदार बारबोले यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता नारखेडे यांच्यासह त्यांच्या पथकातील अंमलदार पोहेकॉ/२९१५ गुणवंत देशमुख, पोहेकॉ/२०९६ प्रशांत विरणारे, पोकॉ/३४६ भरत बाविस्कर, पोकॉ/४७६ पंकज सोनवणे, पोकॉ/२१२१ सागर बिडे, पोकॉ/४२४ प्रविण लोहार आणि पोकॉ/२६८ भुषण पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.








