अपघात दाखवण्याचा डाव रावेर पोलिसांनी हाणला, आरोपी गजाआड!
रावेर (प्रतिनिधी) – जमिनीच्या जुन्या वादातून सख्या पुतण्याने आपल्या काकाच्या डोक्यात लाकडी काठीने जबर प्रहार करून त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील गारखेडा येथे उघडकीस आली आहे.

खून केल्यानंतर हा प्रकार अपघाती मृत्यू भासविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह जवळील नाल्यात फेकून दिला होता. मात्र, रावेर पोलिसांनी कौशल्याने तपास करत अवघ्या काही तासांतच या गुन्ह्याचा छडा लावला असून आरोपी पुतण्याला बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३५८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनिल जखा बारेला (वय २९/३५, रा. गारखेडा, ता. रावेर, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पुतण्याचे नाव आहे. तर रामा थावरू बारेला (वय अंदाजे ४६, रा. गारखेडा) असे मृत काकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर पोलीस ठाण्यांतर्गत पाल दूरक्षेत्र (OP) च्या हद्दीतील गारखेडा गावातील रामा बारेला यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. गारबर्डीच्या पोलीस पाटलांनी २१ जुलै रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास या घटनेची माहिती रावेर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी मृतदेहाच्या डोक्याला उजव्या बाजूला गंभीर जखम असल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मृत रामा बारेला यांचा सख्खा पुतण्या अनिल बारेला याच्यावर संशय बळावला. गेल्या ५-६ दिवसांपासून जमिनीच्या वादावरून अनिल हा आपल्या काकाशी सतत वाद घालत होता व शिवीगाळ करत होता. २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घराजवळ पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी रागाच्या भरात अनिलने लाकडी काठीने काका रामा बारेला यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हा वार इतका भीषण होता की रामा बारेला यांचा जागीच मृत्यू झाला.
काकाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच, अनिलने गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आणि हा प्रकार अपघाती मृत्यू वाटावा यासाठी मृतदेह घटनास्थळावरून २० ते २५ मीटर अंतरावर ओढत नेऊन पायवाटेजवळील एका नाल्याच्या किनारी फेकून दिला. पोलिसांनी संशयित पुतण्या अनिल बारेला याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच, त्याने जमिनीच्या वादातून काकाचा खून केल्याची कबुली दिली. २२ जुलै २०२६ रोजी रात्री पोलिसांनी आरोपीला अधिकृतपणे अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास रावेर पोलीस करत आहेत.









