
डॉ. उल्हास पाटील व डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते विमोचन; इतिहास जतनासाठी पुस्तक महत्त्वाचे
जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे राष्ट्रएकीकरणातील योगदान आणि हैदराबाद संस्थानाच्या भारतात विलिनीकरणाची ऐतिहासिक गाथा उलगडणार्या ’द हैदराबाद फाइल्स’ या पुस्तकाचे प्रकाशन जळगावचे माजी खासदार तथा गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि भाजपाच्या युवा नेत्या डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या पुस्तकाचे लेखन इतिहास अभ्यासक तथा लेखक भारत वाळके यांनी केले असून, त्यासाठी त्यांनी जवळपास १५ वर्षे संशोधन व अभ्यास केला आहे. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण कशा प्रकारे घडवून आणले, त्या काळातील देशाची राजकीय परिस्थिती, निजामशाहीची भूमिका, रझाकारांचे अत्याचार तसेच मराठी, तेलुगू आणि कन्नड भाषिक प्रदेशांच्या पुनर्रचनेतून मराठवाड्याचा महाराष्ट्रात झालेला समावेश या घटनांचा सविस्तर आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.रझाकार संघटनेने हिंदू समाजावर केलेले अत्याचार, धर्मांतरणाचे प्रयत्न, निजाम सरकारचे अन्यायकारक कायदे आणि त्याविरोधात उभ्या राहिलेल्या जनआंदोलनाचे वास्तव चित्रणही पुस्तकात करण्यात आले आहे. तसेच तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी, धाडसी नेतृत्व आणि राष्ट्रएकीकरणातील योगदानाचे माहितीपूर्ण विश्लेषण या पुस्तकात वाचायला मिळते.या पुस्तकासाठी ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी विशेष संदेश देत इतिहासाविषयी समाजात जागृती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.यावेळी बोलताना डॉ. केतकी पाटील म्हणाल्या की, “देशाचा गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रत्येक राष्ट्रभक्ताने आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगावा आणि अशा ऐतिहासिक साहित्याचे वाचन करून राष्ट्रभावना अधिक दृढ करावी.”कार्यक्रमास राकेश वाघ, संकेत शंकपाल, गौरी जोशी, मनीषा खरात, अक्षता शंभरकर, पूजा गांजरे, प्राजक्ता बिडकर, नूतन भाले आदी उपस्थित होते.पुस्तकाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क : राकेश वाघ ९९६०३२७३०३.












