
पाचोरा (प्रतिनिधी) – मजुरीचे थकीत पैसे मागितल्याचा राग मनात धरून तीन जणांनी एका मजुराला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना वरखेडी येथील महासल माता राईस मिलच्या गेटजवळ घडली. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरखेडी (ता. पाचोरा) येथील यश रघुनाथ बारी (वय 23) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी व त्यांचा मित्र हे राईस मिलमध्ये थकीत मजुरीचे पैसे घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी मिलचे व्यवस्थापक रामकुमार (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी पैसे न देता शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी योगेश अशोक चौधरी व सागर अशोक चौधरी यांना बोलावले.
तिघांनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी योगेश अशोक चौधरी याने लोखंडी सळईने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून दुखापत केली. तसेच पुन्हा कंपनीजवळ आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 342/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अभिजित निकम करीत आहेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.










