नशिराबाद ( प्रतिनिधी ) – वाढदिवसाच्या आनंदावर नियतीने ५ दिवसातच दुःखाची छाया पाडली आहे. भवानीनगर परिसरातील एका तीन वर्षीय मुलीचा त्यांच्याच घराच्या पाठीमागे पाऊस पडल्यावर जमा झालेल्या पाण्याची हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या ५ दिवसांपूर्वीच तिचा तिसरा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या घटनेमुळे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कुमारी आकांक्षा प्रवीण (आबा) इंगळे असे या चिमुकलीचे नाव आहे. ती घराच्या आवारात खेळत असताना ही दुर्घटना घडली. सर्व कुटुंबीय जेवणासाठी बसले असताना, ती खेळता खेळता घरच्या मागे असलेल्या पाण्याची हौदात पडली. बराच वेळ तिने न दिसल्यावर घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी ती पाण्याने भरलेल्या हौदात आढळून आली. तिला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि पुढील कार्यवाहीसाठी सहकार्य केले.
आकांक्षा इंगळे यांचा जन्म १ जुलै २०२३ रोजी झाला होता. यंदाच १ जुलै रोजी तिचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाच्या आठवणी ताज्या असतानाच या चिमुकलीच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण भवानीनगर परिसर दुःखात बुडाला आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ही घटना प्रत्येक पालकासाठी एक वेदनादायी इशारा ठरत असून, घराच्या परिसरातील पाण्याचे हौद, टाक्या किंवा इतर धोकादायक ठिकाणी लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.









