भुसावळ तालुक्यातील धक्कादायक घटना; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, ‘ई-साक्ष’ प्रणालीचा प्रभावी वापर
वरणगाव (प्रतिनिधी): येथील सिद्धेश्वर नगर भागातील जलशुद्धीकरण केंद्राच्या स्टोअर रूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरनगाव पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


२ ते ३ जुलै दरम्यान झाली चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, वरनगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या स्टोअर रूममधून २ जुलैच्या रात्री ९.०० वाजेपासून ते ३ जुलैच्या सकाळी ६.०० वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाली. चोरांनी स्टोअर रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तिथून त्यांनी: १) १०,००० रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा २) २०,००० रुपये किमतीचा पाण्याचा सिंगल फेज मळपंप असा एकूण ३०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
५६ वर्षीय कर्मचाऱ्याने दिली फिर्याद
जलशुद्धीकरण केंद्रात नोकरीस असलेले फिर्यादी मुक्तार अहमद अजीज खान (वय ५६, रा. बिदाडी मोहल्ला, वरनगाव) यांनी या चोरीप्रकरणी ४ जुलै रोजी दुपारी १.३९ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून वरनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १८६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५(A) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी अटकेत; ‘ई-साक्ष’चा वापर
गुन्हा दाखल होताच वरनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) अमितकुमार प्रतापसिंग बागुल यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी संशयाच्या आधारे अजय संतोष मोरे (वय २४ वर्षे, रा. सिद्धेश्वर नगर, वरनगाव) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्याच्या तपासात आणि कारवाईत ‘ई-साक्ष’ प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ/२८२८) नितीन डांबरे हे सपोनि अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. सरकारी मालमत्तेची चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ जेरबंद केल्यामुळे परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.









