१० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर जळगावातील घरावर धाड; रोख रक्कम, सोने, प्रॉपर्टीची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंचा साठा उघड
जळगाव (प्रतिनिधी) :- अवघ्या १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या अकोल्याचे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगावातील घरातून तब्बल २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. घरझडतीदरम्यान कपाटे उघडताच रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मालमत्तेची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंचा मोठा साठा पाहून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधिकारीही चक्रावून गेले.


किरण चौधरी यांना २६ जून रोजी अकोला येथे १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले होते. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान त्यांचे जळगावातील विष्णुनगर येथील निवासस्थान समोर आल्यानंतर एसीबीने घरझडतीची प्रक्रिया सुरू केली.
सुरुवातीला घर बंद असल्याने ते पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आले होते. मात्र, २८ जून रोजी पहाटेच्या सुमारास काही नातेवाईकांनी मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडत हा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर २ जुलै रोजी किरण चौधरी यांच्या पत्नी मनिषा चौधरी यांच्या उपस्थितीत पुन्हा घरझडती घेण्यात आली. यावेळी घरातून १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम, ६० लाख ५७ हजार १३५ रुपये किमतीचे ४२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ६२ लाख १३ हजार ३७६ रुपये किमतीच्या विविध मालमत्तांची कागदपत्रे, ३१ हजार ४१६ रुपये किमतीचे चांदीचे दागिने, ११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या आणि ६ लाख २५ हजार ५४५ रुपये किमतीच्या विविध घरगुती वस्तू जप्त करण्यात आल्या.
एकूण २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे महसूल आणि मुद्रांक विभागात एकच खळबळ उडाली आहे. एसीबीकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, बेहिशेबी संपत्तीबाबतही चौकशी केली जात आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.









