३०० कापूस व पॉलिस्टर रुईचे गठ्ठे, दोन यंत्रे जळून खाक; सहा अग्निशमन बंबांच्या प्रयत्नानंतर चार तासांनी आग आटोक्यात
यावल (प्रतिनिधी) – यावल शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळ असलेल्या *डॉ. शैलेश प्रभाकर खाचणे सूतगिरणीला सोमवारी (दि. २९ जून) सकाळी अचानक भीषण आग लागल्याने सुमारे **एक कोटी रुपयांचे नुकसान* झाले. या आगीत सुमारे *७५ लाख रुपये किमतीच्या कापूस व पॉलिस्टर रुईच्या ३०० गाठी* तसेच *२५ लाख रुपये किमतीची दोन यंत्रे* जळून खाक झाली. आग कशामुळे लागली, याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सूतगिरणीच्या गोदामातून धूर निघत असल्याचे सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. गोदामात नुकताच आणलेला कापूस व पॉलिस्टर रुईचा मोठा साठा असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच यावलसह रावेर, सावदा, फैजपूर आणि भुसावळ येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एकूण *सहा अग्निशमन बंबांच्या* मदतीने चार तास अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात यश आले. अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे आग गोदामाबाहेर आणि सूतगिरणीच्या इतर विभागांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
या आगीत गोदामातील सुमारे ३०० कापूस व पॉलिस्टर रुईचे गठ्ठे पूर्णपणे जळून गेले. तसेच कापसाच्या रुईवर प्रक्रिया करणारी दोन महत्त्वाची यंत्रेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्राथमिक पंचनाम्यानुसार एकूण नुकसान जवळपास *एक कोटी रुपये* असल्याचा अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे.
आगीची माहिती मिळताच यावलचे तलाठी पवन नवगाळे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अग्निशमन दलाचे कैलास काटकर, शिवाजी पवार, कृष्णा पाटील, पवन खैरे आणि गणेश कोळी यांनी आग विझविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.









