जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव, प्रतिनिधी एका तरुणीला पैशांची मदत करण्याच्या बहाण्याने कारमध्ये बोलावून तिच्यावर जबरदस्तीने शहरातील सागर पार्क परिसरात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचारानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास ‘परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकीही नराधमाने दिली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील मधुकर चौधरी (रा. धरणगाव)असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची जळगावची असून गेल्या काही वर्षांपासून नाशिक येथे राहून ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते. फेब्रुवारी २०२६ मध्ये ती कामानिमित्त जळगावात आली असताना, जळगाव कोर्ट परिसरात तिची ओळख धरणगाव येथील सुनील चौधरी याच्याशी झाली. सुनीलने स्वतःचा प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला आणि कामासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला.
फेब्रुवारीतील ओळखीनंतर संशयित सुनील चौधरी याने तरुणीशी मोबाईलवर नियमित संपर्क ठेवून मैत्री वाढवली. दरम्यान, जून महिन्यात तरुणीला घराच्या भाड्यासाठी ५ हजार रुपयांची अत्यंत गरज होती. तिने ओळखीच्या विश्वासावर सुनीलकडे पैशांची उसनवारी मागितली. पैसे देण्याचे कबूल करत सुनीलने २४ जून रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास तरुणीला जळगाव शहरातील सागर पार्क परिसरात बोलावून घेतले. तरुणी तिथे पोहोचताच त्याने तिला स्वतःच्या कारमध्ये बसवले आणि तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत कारमध्येच तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला कोणाकडेही तोंड उघडल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. मात्र, या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित तरुणीने हिंमत दाखवत रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी सुनील चौधरी याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन राणशेवरे करत आहेत.









