पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील टहाकळी येथील मूळ रहिवासी तथा सध्या शेरी येथे वास्तव्यास असलेल्या एका ४३ वर्षीय तरुणाने शेतात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक लोटन कोळी (वय ४३) हे मूळचे टहाकळी येथील रहिवासी असून गेल्या सहा वर्षांपासून पत्नी, तीन मुली व एका मुलासह शेरी येथे वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी शेरी येथील मोहन रमेश पवार हे शेतात पळसाची पाने आणण्यासाठी गेले असता, त्यांना गोविंदा व्यंकट पाटील यांच्या शेतात दीपक कोळी यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, दीपक कोळी यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे टहाकळी व शेरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









