भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलगाव येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलगाव येथील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय प्रशांत उर्फ अजय सुकदेव पाटील याने पीडित मुलीशी ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर पीडितेला तिच्या इच्छेविरुद्ध आपल्या राहत्या घरी नेऊन आरोपीने स्वतःच्या मोबाईलमध्ये तिचे फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आणि मारहाण करत आरोपीने गेल्या एक वर्षापासून १८ जून २०२६ पर्यंत तिच्यावर वारंवार बळजबरीने शारीरिक अत्याचार केला.
या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत उर्फ अजय पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ६४(२)(i)(m), ११५(२), ३५१(२) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २१४/२०२६ नुसार दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच भडगाव पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून आरोपीला अटक केली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास तपासिक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करत आहेत.








