काही काळ वाहतूक ठप्प; आग आटोक्यात आणल्यानंतर वाहतूक पूर्ववत
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव बायपास रोडवर आज सकाळी धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. तालुका पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल मिलिंद सपकाळे यांनी सकाळी ८.४५ वाजता अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.


अग्निशमन दलाने तत्परतेने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. आग वाढण्यापूर्वीच ती आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. सुरक्षेच्या दृष्टीने काही काळ बायपासवरील वाहतूक थांबविण्यात आली होती. आग पूर्णपणे विझवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
या बचाव व अग्निशमन मोहिमेत मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक दीपक चौधरी व गोविंद माळी तसेच फायरमन भूषण पाटील, विजय पाटील, किरण पाटील, सुमित साळवे, संजय तायडे, नितीन ससाने, विकी सोनवणे आणि संदीप कोळी यांनी परिश्रम घेत आग विझविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अग्निशमन दलाच्या तत्पर आणि शिस्तबद्ध कार्यवाहीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.









