मुसळधार पावसात पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर कंकराज धरणात सापडला

पारोळा: पारोळा तालुक्यात ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात वाहून गेलेल्या शेवगे बुद्रुक येथील २२ वर्षीय समाधान चुडामन भिल या तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी कंकराज धरणात आढळून आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेचा अखेर दुर्दैवी शेवट झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ३१ जुलै रोजी पारोळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. पारोळा-बहादरपूर मार्गावरील शिवल्या नाला ओलांडत असताना समाधान भिल (वय २२, रा. शेवगे बुद्रुक, ता. पारोळा) हा अचानक आलेल्या पुराच्या प्रचंड लोंढ्यात वाहून गेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी दोन दिवस परिसरात कसून शोधमोहीम राबवली; मात्र त्याचा काहीही पत्ता लागला नव्हता.
त्यानंतर रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेवगे बुद्रुक गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कंकराज धरणाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल संदीप सातपुते, कैलास साळुंखे व ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला.
मृतदेह दोन दिवस पाण्यात असल्याने कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन बाविस्कर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळीच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडली. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत









