मुख्य आरोपीसह साथीदार जेरबंद; चोरीची रक्कम व बनावट पिस्तूल जप्त
पाचोरा (प्रतिनिधी) : अमेझॉन डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून एका महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करत चोरी करणाऱ्या टोळीचा पाचोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीसह साथीदारांना अटक करण्यात आली असून चोरीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले बनावट पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.


जळगाव जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
१२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजता चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी पाचोरा येथील लक्ष्मी आंगण कॉलनी परिसरातील एका महिलेच्या घरी अमेझॉनचे पार्सल आणल्याचे सांगत प्रवेश केला. घरात घुसल्यानंतर आरोपींनी महिलेसह तिच्या दोन मुली आणि मुलाला धमकावत एका ठिकाणी बसवले. त्यानंतर बनावट पिस्तूलाचा धाक दाखवून घरातील सोन्याच्या चिपांची मागणी केली. कपाटातील सामान अस्ताव्यस्त करून आरोपींनी ७ हजार रुपये रोख तसेच मुलाच्या गळ्यातील ७०० रुपये किमतीची रोकड हिसकावून पळ काढला.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. १३ जून रोजी मुख्य आरोपी चेतन उर्फ जितू भुतेकर याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याचा मामा गोकुळ महादू वाघ (पाटील) याचाही सहभाग निष्पन्न झाला. तसेच योगेश परशराम शिंदे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीची ७,७०० रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले बनावट खेळण्यातील पिस्तूल जप्त करण्यात आले.
तपासात फिर्यादीच्या घरात सोन्याच्या चिपा असल्याची माहिती आरोपी गोकुळ वाघ याला मिळाल्याचे उघड झाले. त्याने ही माहिती नितीन पाटील याला दिली. त्यानंतर नितीन पाटीलने आपल्या परिचयातील व्यक्तींना बोलावून या गुन्ह्याचे नियोजन केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, सहाय्यक फौजदार विलास पाटील तसेच योगेश पाटील, हरीष परदेशी, गणेश कुंवर, श्रीराम शिंपी आणि नितीन भालेराव यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.









