रावेर (प्रतिनिधी) : रावेर शहरातील एका हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून तरुणास लाकडी दांडके व लोखंडी पाइपने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित मनोज भावसार (वय ३२, रा. इतवारा, बुरहानपूर) हे १३ जून रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास रावेर येथील राज हॉटेलमध्ये असताना आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर आकाश महाजन, ईश्वर महाजन, सागर (मॅनेजर), सचिन महाजन आणि राज महाजन (हॉटेल मालक, सर्व रा. रावेर) यांनी संगनमत करून सुमित भावसार यांना लाकडी दांडके व लोखंडी पाइपने मारहाण केली.
या मारहाणीत भावसार यांच्या डोक्यावर, पाठीवर, हातापायांवर गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









