संशयितांच्या शोधार्थ एलसीबीचे पथक रवाना; अटकेतील आरोपींची कारागृहात रवानगी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कारमधून ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केल्यानंतर अटक केलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील दोन मुख्य ड्रग्ज पुरवठादार अद्याप फरार असून ते परराज्यात पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांच्या शोधासाठी एलसीबीचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.


एलसीबीच्या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या कारवर छापा टाकून ड्रग्ज विक्रीचा प्रकार उघडकीस आणला होता. या कारवाईत रईस देशमुख, तौसिफ सैय्यद आरिफ आणि कृणाल उर्फ लकी पाटील यांच्याकडून सुमारे ६ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अटकेतील आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज पुरवठा साखळीबाबत धक्कादायक माहिती समोर आली. रईस देशमुख याने अमदज उर्फ बिल्डर शेख (फातेमा नगर), तौसिफ आरिफ याने इम्रान उर्फ इम्मा हसन हुसेन भिस्ती (शाहूनगर) आणि कृणाल उर्फ लकी पाटील याने अन्वर पटेल (सुप्रीम कॉलनी) यांच्याकडून विक्रीसाठी ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली.
या माहितीच्या आधारे एलसीबीने बोरनार येथील अन्वर पटेल याला अटक केली. मात्र अमदज उर्फ बिल्डर शेख आणि इम्रान उर्फ इम्मा हसन हुसेन भिस्ती हे दोघे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मध्यप्रदेश, सुरत, पुणे आणि मुंबई येथे शोधमोहीम राबविली. मात्र दोघांचाही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे हे संशयित राज्याबाहेर पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांच्या अटकेसाठी एलसीबीचे पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे.









