
पेपर मिल परिसरातील दुर्घटना; अपघातानंतर जखमीला मदत न करता चालक पसार


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी पहाटे सुमारे २.५० वाजेच्या सुमारास कंपनीच्या आवारात ही घटना घडली. मृत मजुराची ओळख राजा भैय्या नथ्थू (वय ३८, मूळ रा. बांदा, उत्तर प्रदेश, ह.मु. सुदर्शन पेपर मिल, भुसावळ) अशी झाली आहे.
कंपनी परिसरात रेतीने भरलेला डंपर मागे घेत असताना तेथे झोपलेल्या मजुराच्या अंगावरून वाहनाचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर चालकाने जखमीला वैद्यकीय मदत न करता तसेच घटनेची माहिती न देता वाहनासह घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









