
पोक्सो आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल
पाचोरा (प्रतिनिधी): शहरातील एका भागात एका ८ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीला ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी अनुसूचित जातीची (मागासवर्गीय) असल्याचे माहीत असतानाही आरोपीने हे कृत्य केले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेनंतर काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ४ जून २०२६ रोजी दुपारी ०३:३० वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील एका परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या घरात घडली. संशयित आरोपी रियाज वाहीद पटेल ( रा.पाचोरा) याने ८ वर्षीय पीडित चिमुरडीचा हात धरून तिला बळजबरीने बांधकाम सुरू असलेल्या एका निर्जन घरात ओढत नेले. तेथे एका खुर्चीवर बसवून, पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर गंभीर स्वरूपाचा लैंगिक हल्ला व अत्याचार केला.
या अमानुष प्रकारानंतर पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर, तिच्या २८ वर्षीय आईला सांगितल्याने तात्काळ पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. ४ जून २०२६ रोजी रात्री याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. फिर्याद दाखल होताच पाचोरा पोलिसांनी वेगाने चक्र फिरवून संशयित आरोपी रियाज वाहीद पटेल याला त्याच रात्री अटक केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पाचोरा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक बापू रोहम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. तसेच पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या घटनेचा पुढील तपास स्वतः पोलीस उपअधीक्षक बापू रोहम करत आहेत. चिमुरडीवरील या अत्याचारामुळे पाचोरा शहरात तीव्र संताप व संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.









