एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; १.८७ लाखांच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत दोन सराईत वाहनचोरांना जेरबंद केले आहे. आरोपींकडून तब्बल १ लाख ८७ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

महेंद्र गोपाल चव्हाण (वय २३, रा. खोटेनगर, जळगाव) आणि मुकेश ताराचंद चव्हाण (वय २६, रा. पिंप्राळा हुदको, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघनगर परिसरातील रहिवासी संतोष राणछोड सेंदाणे यांची होंडा शाईन (एमएच १९ सीएल ७५५८) ही दुचाकी १७ मे २०२६ रोजी सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटल परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास सुरू केला.
समर्थ हॉस्पिटल परिसरासह शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तपासादरम्यान संशयितांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महेंद्र चव्हाण आणि मुकेश चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी वाहन चोरीची कबुली दिली.
पुढील तपासात आरोपींकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत सुमारे १ लाख ८७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून आणखी काही वाहन चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.









