बनावट नियुक्ती आदेश व ओळखपत्र तयार करून बेरोजगारांची फसवणूक; दोन आरोपी अटकेत
जळगाव (प्रतिनिधी):- शासनाच्या विविध विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी नेताजी चौक, मेहरूण परिसरातील कुणाल रविंद्र नाईक (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वाती जुनागडे उर्फ स्वाती इंगळे (रा. आंबेडकर चौक, शिवणी अकोला), स्वप्नील राजेंद्र जयस्वाल व अमित राजेंद्र जयस्वाल यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, २०१९ पासून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शासनाच्या विविध खात्यांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी बनावट नियुक्ती आदेश तसेच खोटे ओळखपत्र तयार करून दिले. या माध्यमातून फिर्यादी, त्यांचा भाऊ चेतन नाईक तसेच निखील नाईक यांच्याकडून तब्बल ५५ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले आहे.
आरोपींनी शासनातील अधिकारी व विविध विभागांशी संबंध असल्याचा बनाव करून विश्वास संपादन केला होता. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न देता आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ तपास करीत आहेत. दरम्यान, आरोपी क्रमांक २ व ३ यांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे.










