पहूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा
जामनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वाकोद येथे केळी खरेदीच्या व्यवहारातून तब्बल १३ लाख ३७ हजार १२५ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत शेख युनूस शेख मजीत (वय ४४, व्यवसाय शेती, रा. वाकोद ता. जामनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर युवराज सूर्यवंशी, युवराज सूर्यवंशी व अतुल युवराज सूर्यवंशी (सर्व रा. दशानूर, ता. यावल) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांकडून सुमारे ७०३.७५ क्विंटल वजनाची केळी विश्वासाने घेतली होती. या केळींची किंमत १३ लाख ३७ हजार १२५ रुपये इतकी होती. मात्र, व्यवहारानंतर वारंवार पैशांची मागणी करूनही आरोपींनी रक्कम परत दिली नाही. तसेच टाळाटाळ करत फिर्यादीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही घटना २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान वाकोद येथील शेतगट क्रमांक ४०३ जवळ घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी गणेश सुस्ते करीत आहेत.









