जळगाव (प्रतिनिधी): शिरसोली प्र.न. येथील नायगाव शिवारात गुरुवारी (दि. ७) दुपारी २ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत शेतकरी सुरेश विठ्ठल ताडे यांच्या मालकीचा पावणे दोन एकर क्षेत्रातील मक्याचा चारा आणि सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव शिवारातील गट नं. १६५ मध्ये सुरेश ताडे यांची शेती आहे. ७ तारखेला दुपारी २ ते २:३० च्या दरम्यान अचानक शेतात आग लागली. वाळलेला चारा आणि उन्हाचा तडाखा यामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. या आगीमध्ये संपूर्ण मक्याचा चारा जळून कोळसा झाला आहे. केवळ चाराच नव्हे, तर शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेले ठिबक सिंचनाचे संच, रेडकोठ, पाईप आणि बोरवेलची मोटार यासह इतर साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. विशेष म्हणजे, बोरवेलचा प्लास्टिक पाईप जळाल्यामुळे मोटार थेट जमिनीच्या आत (बोअरमध्ये) कोसळली आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, तलाठी आणि AMCB च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्रशासकीय पातळीवर या घटनेचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, शेतातून गेलेली २४० व्होल्टेजची एल.टी. लाईन किंवा वाढत्या तापमानामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्यात हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी होत आहे.








