मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचे कर्मचारी संघटनांकडून जाहीर आभार
जळगाव (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत आरोग्य विभागातील वर्ग-३ कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने पार पाडल्याबद्दल समन्वय समिती तथा आरोग्य कर्मचारी संघटना, जळगाव यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहेत.


बदली प्रक्रियेदरम्यान प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, याची काळजी घेतल्याने कर्मचारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
कर्मचाऱ्यांच्या सेवाजीवनासह त्यांच्या कौटुंबिक स्थैर्याशी संबंधित असलेली बदली प्रक्रिया अत्यंत संवेदनशील मानली जाते. अशा परिस्थितीत प्रशासनाने पारदर्शकता व न्याय्यतेला प्राधान्य देत प्रक्रिया पूर्ण केल्याने कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
भविष्यातही प्रशासन व कर्मचारी संघटना यांच्यात समन्वयाचे वातावरण कायम राहून कर्मचारी हिताच्या निर्णयांना प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षाही यावेळी समन्वय समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.









