मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकार; बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव परिसरातील मंदिरात ३ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता हा विवाह पार पडला. संबंधित मुलगी प्रियंका रामचंद्र जामुनकर (वय १६ वर्षे ११ महिने) ही अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी सुरपाबाई बाबुराव जामुनकर (वय ६५, रा. उमापूर, ता. जामोद, जि. बुलढाणा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मुलीचे वडील रामचंद्र बाबुराव जामुनकर, आई बबिता रामचंद्र जामुनकर तसेच अन्य संबंधितांनी संगनमत करून अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात झुंबरलाल हिरा धांडेकर, गजानन रमेश मांजरे आणि तुकाराम ऊर्फ मयूर पाटील यांचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सर्वांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कलम ९, १० आणि ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करीत आहेत.









